mamakane family photo

आमच्याविषयी थोडसं

वाचकहो शतकमहोत्सवी या उपाहारगृहाचा इतिहास म्हणजे ते यशस्वीरित्या चालविणाऱ्या आमच्या चार पिढ्यांच्या कर्तबगारीचा चढता आलेख आहे. गणपती पुळ्याजवळच्या रिळ केशपुरी गावातून नारायण विष्णू काणे व्यवसाय करण्यासाठी पेणला गेले. तिथे गणपतीच्या मूर्ती बनविण्याचा व्यवसाय होता. नंतर ते मुंबईत आले. अतिशय हुशार, कर्तबगार, व्यवहारी आणि व्यवसायाची जात्याच आवड असलेल्या नारायणरावांनी १० फेब्रुवारी १९१० रोजी दादर स्टेशनच्या बाहेर तुलसी पाईप रोडवर चहा, पाणी, नाश्ता पुरवणारे एक छोटे दुकान सुरू केले. त्यावेळी दुकानाचे नाव होते ‘दक्षिणी ब्राह्मणाचे स्वच्छ उपाहारगृह’. सुरुवातीला नारायणरावांची आई व बहीण घरातला सगळा सोवळ्यातला स्वयंपाक उरकून उपाहारगृहात यायच्या. मिसळ, पोहे त्याच बनवायच्या. सगळी उपाहारगृहाची व्यवस्था जातीने बघायच्या त्यामुळे साहजीकच उपहारगृहातील स्वच्छता वाखाणण्यासारखी होती. नारायणरावांच्या बहिणींची मुले सुरुवातीच्या काळात व्यवसायात मदतीला होती. ती त्यांना मामा म्हणत मग सगळेच मामा म्हणायला लागले. पुढे उपाहारगृहाचं नाव बदलले तेव्हा मामा काणे हे नाव इतकं परिचित झाले की मामा काणे यांचे स्वच्छ उपहारगृह असे नाव दिले गेले.

mamakane family

परिश्रम केल्याशिवाय असणारे जीवन म्हणजे गुन्हा आहे अशी धारणा असणाऱ्या मामा काणे यांनी उपाहारगृहाची सुरुवात केली. पुढे व्यवसायाची दीक्षा मामा काणे यांचे चिरंजीव शंकरराव यांनी अतिशय स्वेच्छेने, आनंदाने स्वीकारली. शंकररावांच्या काळात मामा काणे उपाहारगृह यशाच्या शिखरावर पोहचले असं म्हणायला हरकत नाही. श्री. कमळाकर, श्री. रामकृष्ण व श्री मुकुंद ही शंकररावांची मुले म्हणजेच मामा काण्यांची नातवंडे म्हणजेच तिसरी पिढी उपाहापगृहाचा संपूर्ण व्याप सांभाळत आहे. श्री. कमळाकरांची दोन्ही मुले श्री.दिलीप व श्रीधर म्हणजेच चौथी पिढी उपाहारगृहात नव्या जोमाने काही योजना घेऊन उतरली आहे. उपहारगृहात सुरुवातीला पोहे, मिसळ, साबुदाणा खिचडी, थालीपीठ असे महाराष्ट्रीय पदार्थ असायचे. १९२८ मध्ये बटाटेवडा सुरु केला आणि या वड्याने क्रांती केली. दादरला गेले की मामा काणे यांचा वडा खायचाच असं जणू लोकांच ठरलेलंच असायचं. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन १९३५ मध्ये राईस प्लेट सुरु झाली. त्यावेळी राईसप्लेटची किंमत होती दोन आणे. मराठी माणसाला घरचे नसले तरी घरासारखे पदार्थ मामा काण्यांकडे अतिशय योग्य दरात मिळत होते. ग्राहकांची मागणी आणि आपली सोय या दोन्हीचा मेळ घालून उपहारगृहात शंकररावांनी बदल केले. पदार्थ वाढवले. अर्थातच मामांकडून या बदलाचे स्वागत तर झालेच. ग्राहकही संतुष्ट झाले. श्री कमळाकर इलेक्ट्रिकल इंजिनिअर तर त्यांचा मोठा मुलगा श्रीधर एम. टेक. आणि धाकटा मुलगा दिलीप सी. ए. आहे. दोघेही आनंदाने, आपुलकीने आणि त्यांच्या स्वतःच्या मर्जीने उपाहार गृहाची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळत आहेत. आमच्या इथे रोज शेकडो ग्राहक येत असतात. त्यांना चांगल्या खाद्यपदार्थाबरोबर चांगली वागणूक मिळाली तर ते आपल्याकडे पुन्हा पुन्हा नक्कीच येतात हा आमचा अनेक वर्षांचा अनुभव आहे त्यामुळे ग्राहकाची ‘विनम्र सेवा’ आम्ही व आमचे सर्व सहकारी आनंदाने करत आलो आहोत. मामा काणे यांचे स्वच्छ उपहारगृह या नावातली स्वच्छता आजही टिकून आहे. तुम्ही केव्हाही स्वयंपाकघर बघायचे असेल तर बघू शकता. इतकी आम्हाला स्वच्छतेबद्दल खात्री आहे. पुरणपोळी, श्रीखंड, हलवा, पियुष, पन्हं, आवळा सरबत, भजी, वडा, मिसळ, उपवासाचे पदार्थ या सगळ्या पदार्थांबरोबर मामा काण्यांची थाळी अनेकांना तृप्त करीत आली आहे. ‘मामा काणे स्वच्छ उपाहारगृहाचा’ पाया रचिला मामा काणे यांनी, शंकररावांच्या काळात उपहारगृहाने जनमानसात महत्त्वाचे स्थान मिळवले, कमळाकर, रामकृष्ण, मुकुंद या तिसऱ्या पिढीने उपहारगृहाला विस्तृत स्वरुप दिले. चौथी पिढी हा व्यवसाय कळसाकडे नेण्याच्या प्रयत्नात आहे. डोळ्यासमोर ध्येय ठेवून सतत केलेले प्रयत्न, ग्राहकांची आपुलकी, सहकाऱ्यांचे सहाय्य याबरोबरच काणे कुटुंबियांवर असलेली परमपूज्य श्रीधरस्वामींची कृपा यामुळेच आम्ही इथवर आलो आहोत असे आम्हाला कायम वाटत आले आहे.

Location
bar logo

222, Smruti Kunj, Senapati Bapat Marg, Dadar West, Mumbai, Maharashtra 400028.

FoursquareYouTubeInstagram

1910-2021 MamaKanes.com | All Rights Reserved.